नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे
एका बाजूला ‘पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया’च्या घोषणा दिल्या जात असताना, बिलोलीत मात्र शिक्षणाच्या नावाखाली पालकांच्या श्रमाच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील संहिती शिक्षण संस्था संचलित ‘लिट्ल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ च्या मनमानी कारभाराविरोधात उच्चशिक्षित महिला श्रुती गादगे यांनी थेट प्रशासनाशी दोन हात करण्याचा पवित्रा घेतला असून, या शाळेचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
या शाळेचा इतिहास वादानेच बरबटलेला आहे. यापूर्वी गांधीनगर भागात नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून ही शाळा चालवली जात होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रशासनाने शाळेला सील ठोकले होते. मात्र, त्यातून धडा घेण्याऐवजी संस्थाचालकांनी सावळी रोडवर आपला नवा ‘डेरा’ टाकला आणि लुटालुटीचे नवीन केंद्र सुरू केल्याचा आरोप गादगे यांनी केला आहे.तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील शिक्षकांची पात्रता विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच जर पात्र नसतील, तर भविष्यातील पिढी कशी घडणार? अवघ्या ७ ते ८ हजार रुपयांच्या तुटपुंज्या पगारावर अपात्र लोकांकडून हे शिक्षण दिले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांपर्यंत फी उकळली जाते. ही फी नेमकी कोण ठरवते? असा प्रश्न विचारल्यावर ‘पालक समिती’चे नाव पुढे केले जाते. मात्र, ही समिती म्हणजे संस्थाचालकांच्या मर्जीतील लोकांचा एक ‘बनाव’ असल्याचे आता बोलले जात आहे.
श्रुती गादगे यांनी केवळ तक्रार करून न थांबता, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. या शाळेसह तालुक्यातील इतर खाजगी शाळांच्या आर्थिक व्यवहारांची ‘आर्थिक गुन्हे शाखा’ (EOW) आणि ‘आयकर विभागा’ मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावले आहेत. उच्चशिक्षित महिलेने पुराव्यांसह पुकारलेल्या या लढ्यामुळे बिलोलीतील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता शिक्षण विभाग आणि महसूल प्रशासन यावर काय कारवाई करते, की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवून या प्रकरणावर पडदा टाकते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
“पालकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा संस्थांना चाप लावणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून त्वरित चौकशी केली नाही, तर बिलोलीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करू,” असा इशारा श्रुती गादगे यांनी दिला आहे.
Author: Vaibhav Ghate
Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734





