V1News Telangana

best news portal development company in india

नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार, अशी अपेक्षा असताना रुग्णांना उपचारासाठी घ्यावे लागतो तालुक्याचा आधार

SHARE:

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बिलोली :तालुक्यातील मौ अटकळी गावात नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे नुकतेच मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटन सोहळा पार पडूनही प्रत्यक्षात दवाखाना नियमित सुरू न झाल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी इतर गावांचा आधार घ्यावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या या आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार, अशी अपेक्षा होती. उद्घाटनावेळी विविध मान्यवर उपस्थित राहून आरोग्य सुविधा गावाच्या दारात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत उपकेंद्राला अनेकवेळा कुलूपच लागलेले दिसत असल्याने उद्घाटन केवळ औपचारिकतेपुरतेच राहिल्याची चर्चा गावात सुरू आहे.
गावातील रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना साध्या उपचारांसाठीही दूरच्या दवाखान्यात जावे लागत आहे. वाहतूक सुविधा अपुरी असल्यामुळे अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार उपलब्ध नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
आरोग्य उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचारी उपलब्ध असले तरी त्यांची इतर गावांमध्येही ड्युटी असल्यामुळे अटकळी गावात नियमित सेवा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अटकळी गावासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच औषधसाठा व वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविण्याचीही आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी संबंधित आरोग्य विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोग्य उपकेंद्र नियमित सुरू करावे व गावासाठी कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नियुक्त करून नागरिकांना अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थकडून केली जात आहे

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

best news portal development company in india